सत्कारमूर्ती भारती ठाकूर यांच्याविषयी

सत्कारमूर्ती भारती ठाकूर यांच्याविषयी

डॉ. माशेलकर
(सायं ६ वा. एस. एम. जोशी फाऊंडेशन, सभागृह, पुणे)

सत्कारमूर्ती भारती ठाकूर यांच्याविषयी


नाशिकमधील केंद्र शासनाची नोकरी सोडून शिक्षणाच्या क्षेत्रात योगदान देण्याची प्रेरणा तुम्हाला नर्मदा परिक्रमेच्या निमित्तानं मिळाली. या परिक्रमेतील अनेक अनुभव त्यासंबंधीच्या पुस्तकात आपण मांडले आहेत. हे पुस्तक म्हणजे प्रत्यक्ष परिक्रमेचा तर अनुभव आहेच, पण त्याचबरोबर आपण त्या पुस्तकाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणं ही एक अंतर्यात्रासुद्धा आहे. ही तुमच्या मनाची अंतर्यात्रा आहे. मध्य प्रदेशातल्या निमाड परिसरातून जाताना तुम्ही समृद्ध शेती पाहिलीतच, पण खऱ्या अर्थानं अनुभवलंत, ते त्या समृद्धीमागचे वास्तव. सर्वसामान्यांचे होणारे शोषण, बालमजुरी, महिलांवरचे अन्याय, पुरुषांची व्यसनाधीनता. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आणखी ३ वर्षांनी ७५ वर्षे होतील. पण आजही देशाच्या अनेक भागात गरीबीमुळं शिक्षणाचा अभाव, आरोग्याची आबाळ आणि काही ठराविक लोकांचाच झालेला विकास आपल्याला पहायला मिळतो, हे दुर्दैव आहे.

पण आपण यावर केवळ हतबल होऊन थांबला नाहीत. तुम्ही स्वतःच्या मनाशी निश्चय केलात, नाशिकमधल्या झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्यापासून ते आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या शाळा चालवण्यापर्यंतचा अनुभव पाठीशी घेऊन, नर्मदच्या सुपुत्रांनी हाक मारताक्षणी आपण तिथे पोचलात. नर्मदालयाच्या माध्यमातून गेली दहा वर्षे आपण शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, संगीत, गोशाळा, शेतीकाम अशा जीवनाच्या अनेक अंगांनी तिथल्या लोकांसाठी विविध उपक्रम राबवलेत. त्यासाठी जगजागृती केलीत. प्रचंड कष्ट घेतलेत. आपल्या सर्वांच्या स्वप्नातील नवभारताच्या उभारणीसाठी नर्मदा तीरावरच्या एका परिसरात आपण पाय रोवून खंबीरपणे काम सुरू केलंत. हजारो मुला-मुलींच्या आयुष्याची, त्यांच्या भविष्याची आपण कसदारपणे एकप्रकारे पेरणीच केलीत. हे काम सोपे नाही. त्यामागचा त्याग, समर्पण आणि आपल्या देशबांधवांच्या विकासाची तळमळ हे सगळं आपल्याप्रमाणेच अन्य भारतीयांमध्ये देखील यावं, त्यातूनच विश्वाला मार्गदर्शन करणारा नवीन भारत घडणार आहे. अशा नवनिर्मिती करणाऱ्या एका भगिनीचा सत्कार करणे हा मी माझा सन्मान समजतो. आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.